Friday, December 31, 2010

पास्ट लाइफ रिग्रेशन १

नमस्कार!


माझं नाव शुभा येरी।


उद्योग?


कथा-कादंबर्या लिहिणे आणि 'मृत्यू' या विषयाच्या विविध पैलूंचा शोध घेणे.

इंग्लिश मध्ये माझा 'गोइंग होम' याच नावाचा ब्लॉग आहे.
त्याची tag लाईन आहे - मृत्यू हा सुस्मित (करेल) असा मैलाचा दगड आहे.
(हे खरं आहे!)

डेथ इज अ स्माईल स्टोन.
(हे वाचायला जरा जास्त बरं आहे!)

हा ब्लॉग [मृत्यू या विषयावर असला तरी] सकारात्मक, आध्यात्मिक व वाचणार्याला आत्मबळ देणारा आहे.
असं tag लाईनमध्ये लिहिलंय आणि ते खरं आहे!

आता कामाला लागूया!

गेल्या २५ वर्षापासून मी केवळ कुतूहल म्हणून काही प्रश्नांची उत्तरं शोधतेय -

'आपण मृत्यूनंतर कुठे जातो?',
''चांगल्यांना वाईट आणि वाईट असणार्यांना चांगलं का होतं?',
'देव सगळं मूकपणे का बघतो?',
'जन्म घ्यायच्या आधी मी कुठे होते?',
' स्वर्ग आणि नरक या दोनच जागा आहेत का?',
' मोक्ष म्हणजे नक्की काय?'
वगैरे वगैरे.

माझ्या संशोधनात मला याचीच नव्हेत, तर इतर अनेक अजून न सुचलेल्या प्रश्नांचीही मस्त उत्तर मिळाली.

'नियती पुढे आपण असहाय',
'आपण काहीच करू शकत नाही',
'नशिबाचे भोग'

यासारखे रद्दी विचार उडून गेले.

'का?' आणि 'कसं?' हे कळलं.

मग गप्प कसं बसवणार?!
कुठे नव्या ठिकाणी मस्त बटाटा-वडा मिळतो म्हंटल्यावर आपण नाही दहा जणांना सांगत?!
हे तर कित्तीतरी जास्त इन्टरेस्टिंग !

लेख लिहायला सुरुवात केली.
वाचकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
'आणखी लिहा' अशी मेल्स, फोन्स आले.
पण व्यासपीठांची पंचाईत होऊ लागली.

म्हणून हा ब्लॉग.
आता नेटवर वाचू शकतील त्यांनाच याचा उपयोग होईल हे खरं आहे, पण निदान एवढं तरी.
पुढे एखादा मार्ग किंवा 'मेनस्ट्रीम' मासिक/ पाक्षिकाचा धाकड संपादक मिळेल अशी आशा करूया!

आपण काही सुचलं तर सांगा.
सध्या हा ब्लॉग!

आज पहिल्या पोस्टमध्ये मी सध्या खूप गरमा-गरम असलेला विषय घेते.
पास्ट लाइफ रिग्रेशन !

या विषयावरच डॉकटर ब्रायन वाईस यांचं 'मेनी लाईव्स मेनी मास्टर्स' हे पुस्तक मी २००१/२ च्या सुमारास वाचलं.
वाटलं, काय मस्त प्रकार आहे!
आपल्या देशात तर नाही, कधी अमेरिकेला गेलो तरच संधी मिळणार.

मग २००३ मध्ये हैदराबादच्या डॉक्टर न्यूटन यांच्यावरचा खूप मोठा लेख वाचनात आला.
त्याना आपण भारताचे ब्रायन वाईस म्हणू शकतो.
गेल्या २५ वर्षांपासून रिग्रेशन हा उपचाराचा प्रकार सामान्य माणसांपर्यंत पोचवायचे ते सतत प्रयत्न करत आहेत.

आजही पूर्वजन्मालाच अंधश्रद्धा म्हणणारे खूप आहेत, तेव्हाही म्हणायचे, पण ते आणि त्यांची पत्नी डॉकटर लक्ष्मी खंबीरपणे, शांतपणे याचा प्रचार करत राहिले.

मला तर ही पर्वणीच होती.
त्या लेखात फोन नंबर पण दिला होता.
लगेच वेळ ठरवून सलग तीन दिवस सेशन घेतली!
स्वतः बद्दल केवढी तरी माहिती मिळाली!
मजा वाटली.
.
मग दोन वर्षांपूर्वी मी स्वत पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट बनले.
( मला बनवलं गेलं!).

'वरचे हुकुम' अंतर्मनातूनच येतात, पण ते टाळता येत नाहीत!

गेल्या दोन वर्षातल्या सेशन्स मधून माझ्या जाणीवेची क्षितिज खूप खूप विस्तारत गेली.
आपण खूप कोतेपणाने विचार करतो, उगाच भिंती घालून घेतो व मग प्रगती का होत नाही म्हणून रडत बसतो हे कळून चुकलं.

रिग्रेशनच्या थेरपीत आम्ही तुम्हाला तुमच्याच मनाच्या खोल खाली असलेल्या सुरेख, सुरक्षित स्थानी नेतो.
तुम्ही आल्यावर लिहिलेल्या प्रश्नांची चर्चा करून कुठला पूर्वजन्म बघायचा हे आधी ठरवलेलं असतं.

एका माणसाला हा प्रश्न होता, की माझ्या ऑफिसातले लोक माझ्याशी इतके वाईट का वागतात?
३-४ जण होते.
त्याला असं कळलं की ते सगळे व तो एका पूर्वजन्मात एका मोठ्या कुटुंबातली चुलत/मावस/ वगैरे भावंडं होती.
वार्षिक सुट्टी झाली की सगळे खेळ, मजा, अभ्यास मिळून करायचे.
एकदा याने एका भावाचं अभ्यासाचं पुस्तक लपवलं आणि 'मला माहित नाही' असं खोटं सांगितलं.
त्या भावंडाचा गृहपाठ झाला नाही.
ते याचं कृत्य होतं, हे सगळ्यांना कळलं पण याने शेवटपर्यंत मान्य केलं नाही.

या घटनेनंतर आजोळी दर वर्षी ते एकत्र सुट्टी घालवणंही थांबलं.

ती सगळी भावंडं आता त्याच्या ऑफिसात बरोबर होती आणि त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हती!

त्या जन्मातल ते दृश्य पाहिल्यावर, त्याच जन्मात त्यांची माफी मागितल्यावर, या जन्मात त्याचे सर्वांशी संबंध सुधारले.

'त्या' सर्वांना आपण आधी असे का फटकून वागवायचो आणि आता का नीट वागतो हे अजून माहित नाही आणि माहिती व्हायची गरजही नाही!
पण त्या माणसाच्या कर्माचं एक गाठोडं त्याने कायमचं मोकळं केलं.

रिग्रेशनच्या थेरपीत आम्ही अशा अनेक गोष्टी करतो.

हा सर्व प्रकार का, कसा सुरु झाला, याचा अंत कुठे, कसा व केव्हा या सारख्या प्रश्नांची उत्तरं पुढील 'पोस्ट्स' मध्ये येतील.

मी पंधरा दिवसातून एकदा लिहित जाईन.

आपण आपले प्रश्न. शंका, टीका जे असेल ते पाठवा.
नव्या वर्षाच्या शुभेच्छा!