Thursday, May 12, 2011

वरील चार चक्रं

नमस्कार, मंडळी!

आपण कसे आहात?


माझ्या पायाची भिंगरी परत फिरू लागली आहे!

मी उद्यापासून ९ ते रात्री ९ अशी एक कार्यशाळा करतेय.

एक महिन्यासाठी!

त्यामुळे यापुढची पोस्ट १५ जूनला असेल.

कार्यशाळेत काय शिकले, काय मजा केली तेही त्यात सांगेन!

मागच्या पोस्टमध्ये आपण मूलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रांची थोडीशी माहिती घेतली व आशा आहे की २ - २ मिनिटं का होईना, त्यांच्यावर ध्यानाला सुरुवात केली!


आता आपण चौथ्या चक्राबद्दल जाणून घेऊ.

याचं नाव 'अनाहत' व स्थान हृदयात आहे.

याचं तत्त्व आहे हवा.

या चौथ्या चक्रापासून पंचमहाभूतांतील तत्त्व
जणू अदृश्य होतात!

मागील तीन होती पृथ्वी, जल आणि अग्नि, ज्यांचा सगळ्या इंद्रियांमधून अनुभव घेता येतो.

आता मात्र जाणण्यावर भर येतो,अनुभूतीचं महत्व वाढतं.


अनाहत चक्राचा रंग हिरवा आहे व याला बारा पाकळ्या आहेत.

हे नीट कार्यरत असलं की आपल्यात इतरांबद्दल प्रेमाचे भाव असतात ज्यामुळे मन:शांती मिळते.

या चक्रापासून, या चक्रातून,आपण जसे बाहेरच्या जगाकडे बघायला लागतो.

आपल्यात अनुकंपा व प्रेमभावना असेल तर खालील तीन चक्रांमध्ये जो भयगंड,वासना व भावनांचा कल्लोळ असतो,तो संतुलित होऊ लागतो.

आता शांतपणे बसा व हृदयावर लक्ष केंद्रित करा.

श्वासात बदल करू नका. काही मिनिटं मन तिथे केंद्रित करा.


आणखी काही माहिती!

पहिल्या, मूलाधार चक्राचा मार्ग हठयोगाचा आहे.

दुसरया, स्वाधिष्ठान चक्राचा मार्ग तंत्राचा आहे.

तिसरया मणिपूर चक्राचा कर्ममार्ग आहे.

चौथ्या अनाहत चक्राचा भक्तीचा आहे.


आता पाचवं 'विशुद्ध' चक्र बघू.

हे आपल्या गळ्यात असतं.

याचा रंग तेजस्वी निळा असतो आणि याचं तत्त्व असतं ध्वनी.

संपर्काबरोबरच हे निर्मिती किंवा सृजनाचही स्थान आहे.

याला सोळा पाकळ्या आहेत व याचा मार्ग आहे मंत्राचा.

मागीलप्रमाणेच या विशुद्ध चक्राच्या जागेवर मन केंद्रित करून थोडा वेळ स्वस्थ बसा.


आपलं सहावं चक्र आहे 'आज्ञा' जे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे.

याचा रंग नीळ आहे व तत्त्व
आहे प्रकाश.

हे आपल्या अंतर्ज्ञानाच व कल्पनेचं स्थान आहे.

याला दोनच पाकळ्या असतात व याचा मार्ग आहे यंत्राचा.

अनेकांना या जागी ध्यान लावायची सवय असते व कधीकधी काही 'अनुभव' - म्हणजे ज्योत, प्रकाश वगैरेही दिसतं म्हणतात.

एकाच लक्षात ठेवायचं!

ही जणू शिडीची सहावी पायरी आहे.

एकदम इथूनच सुरुवात केली किंवा खालाच्यानकडे दुर्लक्ष झालं तर कोसळायला वेळ लागत नाही.

आपल्या ऐकिवात / माहितीत असे अनेकजण असतील जे अध्यात्मिक मार्गावर दोन पावलं गेलं की अफाट भक्तगण गोळा करतात, पैसा जमवतात, यातलं काही कमी होऊ नये, कुणाला आतल्या गोष्टी कळू नये म्हणून सुरक्षेची मोठ्ठी यंत्रणा जोपासतात.

मग त्यांचे पैशाचे गैर व्यवहार, वासनाकांड, खून, बळी सारखे गुन्हे उघडकीस येतात.

खालच्या तीन चक्रांवर नियंत्रण असणं म्हणून महत्त्वाचं आहे.


सातव्या चक्राला 'सहस्रार' म्हणतात व ते टाळूवर असतं.

याचा रंग गडद जांभळा किंवा पांढरा शुभ्र असतो.

याचं तत्त्व आहे जाणीव.

याचं काम आहे समजणे, उमजणे, ज्यामुळे परमानंदाची अनुभूती होते.

याचा मार्ग ज्ञानाचा आहे.

सातही चक्रांवर आपण रोज २-३ मिनिटं शांतपणे ध्यान केलत की चक्रांची जाणीव होऊ लागेल.

ही १२ - १५ मिनिटं स्वत:ला द्याच.

ही जशी संतुलित होऊ लागतील, तसं आयुष्यातही संतुलन येईल.

चक्रांवर इंग्रजीत खूप खोलात जाऊन, संशोधन करून अनुभव घेऊन मग लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत.

अतिशय गंभीरपणे यावर संशोधन झालं आहे व चालू आहे.

त्याच बरोबर रस असणाऱ्या प्रत्येकाला याचा पुरेपूर लाभ घेता येईल अशा कार्यशाळा घेतल्या जातात.

मी काही पुस्तकांची नावं देते. मोठ्या दुकानात मिळायला हरकत नसावी.

Chakras Wheels of Life - Anodea Judith Ph.D

Eastern Body Western Mind : Psychology and the Chakra System as a Path to the Self - Anodea Judith Ph.D

Anatomy of the Spirit : The Seven Stages of Power and Healing - Dr Caroline Myss

आता अभ्यासाला लागा!

एक महिन्याने भेटू.

बाय!