Friday, January 14, 2011

प्रस्थान

नमस्कार !

जन्म, मृत्यू, परत जन्म, परत मृत्यू हे चक्र कधी सुरू झालं असेल हा प्रश्न अनेकांच्या मनात येऊन जातो.
आपल्याकडे हे साधारणपणे सर्वमान्य आहे की हा जन्म मागच्या कर्मांची फळ भोगायला घ्यावा लागलेला आहे.

मला असं प्रश्न नेहमी पडायचा की मग मागचा जन्म का होता?
त्याच्या मागच्या जन्माची फळ भोगायला?

हे किती मागे जातं?
आणि कधी संपणार?

जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटायचं असेल तर 'हे मुळात सुरूच का झालं?' याचं आधी उत्तर हवं.
असं सगळं लक्ष केंद्रित करणारा स्पष्ट असा मस्त प्रश्न मिळाला की मजा येते !
उत्तरं फार लांबही नसतात, फक्त आपल्या मनाची क्षितिज जरा उघडायची.

आपल्या धार्मिक ग्रंथांतून पूर्ण समाधान न झाल्यावर मी इंग्रजीतली पुस्तकं वाचायला सुरुवात केली.
पहिल्या पुस्तकानेच 'आ' वासायला लावला.
नाव होतं, 'यू' व्ह बीन हिअर बिफोर!'.

वाटलं, 'हो?! खरच?! काय मज्जा!'

'असंही असू शकेल' असा दृष्टीकोन ठेउन शोधल्यावर भराभर वेग-वेगळ्या पैलूतून लिहिलेली असंख्य पुस्तकं मिळत गेली.

माझा मूळ प्रश्न विसरले नव्हते -
हे चक्र का आणि कशाने सुरु झालं?

आता जोडीला आणखीही आले होते-
सगळ्या मनुष्य जातीने अपराध केला होता?
कसला अपराध होता तो ?
आणि अजूनही आत्मे परत-परत जन्म का घेत आहेत?
कुणीच कसं कर्मांची फळे भोगून मुक्त होत नाहीये?

मग दोन वेगवेगळ्या स्रोतातून मस्त उत्तरं मिळाली.
नीट वाचून पचवा बरं का, आपल्याला स्वतः बद्दल असा विचार करून सवय नाहीये!

आपण सगळे 'को-क्रिएटर्स' आहोत, सृष्टीकर्ते आहोत.

आपल्याला सृजनाचा आनंद घ्यायचा होता, म्हणून आपण स्वेच्छेने जन्म घ्यायचं ठरवलं.

आपल्यावर कोणी जबरदस्ती नाही केली, कोणी शाप देउन, लाथ मारून पृथ्वीवर नाही पाठवलं.

आपले जन्म ही शिक्षा नाही, आपण विचारपूर्वक निवडलेला अनेक डावांचा खेळ आहे.
हा खेळ सुरू करण्याआधी आपण खूप विचार करतो.
खाली पृथ्वीवर, इतर ग्रहांवर काय चाललंय हे स्पष्ट दिसत असतंच!
काही जण एकटेच येऊन, अनुभव घेउन जायचं ठरवतात.
त्यांना नाती-गोती नको वाटतात. अशी माणसं माणूसघाणी वाटतात.
उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर ती आहेत, यावर ती काय करतात हे अवलंबून असतं.
उदाहरणार्थ, कुणी शास्त्रज्ञ असू शकेल, किंवा साधू, विचारवंत, संशोधक.
काही जण विचार करतात की एकटे नको रे बाबा, आपण १५० ते २०० च्या टोळीत जाऊ, तेवढंच जरा जास्त सुरक्षित वाटेल!

आपण बहुतेक जण या 'सूज्ञ' विचाराने आलेलो आहोत!
या टोळीतली माणसं आलटून पालटून एकत्र जन्म घेतात व आपणच निवडलेले धडे शिकत सृजनाचा आनंद अनुभवतात.


आपल्याला काय शिकायचं यावर अवलंबून आपण आपली रक्ताची व लग्नाची नाती निवडतो.
शिवाय गुरू, मित्र-मैत्रिणी सहयोगी व शत्रूही.

या दोनाशिवाय तिसराही एक गट आपण तयार करतो.
तो जास्त मोठा असतो, काही लाख किंवा कोटींचा, आणि तो असतो धर्मांचा, कातडीचा किंवा आपल्या देशात जातींचा.
आपण स्वतःच्या इच्छेने जे अनुभवायचं आहे, त्यावर अवलंबून त्या धर्मात, जातीत जन्म घेतो.
सृजनाचा आनंद घेत असताना जी कर्मं करतो, ती संपली, की आपण परत पूर्वीच्या स्थितीला जाउन मिळतो.
ही 'मुक्ति' प्रत्येक मृत्यूनंतर होत नाही. मुक्ति एकदाच असते.
आपण ध्येय ठरवून प्रस्थान ठेवल्यावर मार्गात जे आलं ते भोगत, चैतन्याच्या वरवरच्या पातळ्या गाठत, आनंद घेत शेवटी यातून बाहेर पडतो.

युरोप व अमेरीकेत्तोन या विषयांवरची जी पुस्तकं आली व येत आहेत, ती खूप विचार करायला लावणारी आहेत.
मला या सर्वातली एक गोष्ट खूप आवडली -
याची खात्री झाली की मला जे चांगलं - वाईट होतंय त्याला मी स्वतःच जबाबदार आहे.
ना कुणाची कृपा ना शाप!

मला हवं तसा आयुष्य हवं असेल तर काय नक्की काय करायचं, हे स्पष्ट झालं!

उत्क्रांतीच्या ज्या ७ पातळ्या आहेत, त्याबद्दल पुढच्या 'पोस्ट'मध्ये बघू.
काही प्रश्न, शंका, टीका जे असे ते पाठवा!
बाकी आयुष्य मस्त असतं म्हणून त्याच्यापेक्षा स्वतःला जास्त सामर्थ्यवान समजा!

No comments:

Post a Comment