Wednesday, March 9, 2011

७ पातळ्या

रामराम!

कसे आहात?!
बर्याच दिवसांनी लिहितेय!

माझ्या पायाला न, भिंगरी आहे!
आणि डोक्यात अनेक मस्त विचार!

मागच्या महिनात, १ ते २८ फेब्रुवारी, मी 'योग प्रशिक्षक' चा कोर्स केला!
आता मी खरच कुणाला शिकवणार आहे का?!
नाही! पण मला स्वत:साठी जी शिस्त हवी होती, एक आठवडा, १० दिवस नाही, जास्त काळासाठी, ती महिनाभर मिळाली।



तुम्हीही S VYASA हे गुगल करा आणि सगळी माहिती नीट वाचून बघा.
स्वामी विवेकानंदानच्या नावाने काढलेलं, बेंगलोर च्या बाहेर ३२ कि मी वर असलेलं हे एक योग अनुसंधान संस्थान आहे.
सुरुवातीला तिथे वाटलं की ब्लॉगवर जाउन अपडेट करता येईल, पण अगदी मस्त गुंतवून ठेवलं होतं!
पहाटे ४ ला उठायचो, रात्री ९.३० नंतरच पाठ टेकायची!
तसा मध्ये विश्रांतीला वेळ असायचा, पण पोस्ट लिहिण्याइतका सलग नाही।


आपण 'प्रस्थान' या पोस्टमध्ये आपल्या या जन्मांची सुरुवात कशी झाली ते जाणून घेतलं.
आपण एकटे येतो, १५० ते २०० च्या कबिल्यात किंवा आणखी मोठ्या, लाखो - कोट्यवधींच्या आकड्यात.

आता पुढची पायरी बघू.
आपण सुरुवातीला धरती, पर्वत, नद्या असे 'minerals ' या क्षेत्रात मोडतील असे जन्म घेतो.
मग वृक्ष, झाडं, फुलं - पानं वगैरे.
त्यानंतर प्राणी - पक्ष्यांचे जन्म येतात व शेवटी मनुष्याचे.

आपली एक घट्ट अशी आणि अफाट सोयीस्कर अशी खात्री आहे की हा माणसाचा जन्म संपला की स्वर्ग!
आपण कसेही वागलो तरी आपल्याला मोक्षच मिळणार, नाहीतर कमीतकमी स्वर्ग, कारण मनुष्याचा जन्म हेच आपलं ध्येय होतं.
भारताची लोकसंख्या वाढतच राहायला हे एक कारण असू शकेल!
'मी कड्यावरून उडी मारली तरी खाली पडणार नाही', 'मी विष प्यालो तरी जगेन कारण माझा माझ्या गुरूंवर पूर्ण विश्वास आहे', 'माझी साधना इतकी खडतर आहे की हा माझं शेवटचाच जन्म आहे' असं आपण अनेक वेळा ऐकतो.
शेकडो भ्रष्टाचार्यांना याचं खात्रीत मस्तीत जगताना बघतो.
आपण इथे गल्लीचे दादा असू किंवा भाई, निसर्गाचे नियम कोणासाठीही बदलत नाहीत.

मनुष्याच्या उत्क्रांतीत त्याचे पहिले काही शेकडा जन्म भयभीत अवस्थेतले असतात.
'मी त्यांना मारलं नाही तर ते मला मारणार' अशी त्यांची पक्की खात्री असते, म्हणून ते चटकन खून, मारहाण करू शकतात.
या पातळीवर अनेक जन्म घेतल्यावर ते जरा योजनाबद्ध आयुष्य शोधतात.

ही दुसरी पातळी. यांना 'आपले लोक' जवळ असले कीच सुरक्षित वाटतं म्हणून हे क्लब, संघ, संघटना, ग्रूप वगैरे बनवून अनेकांचा आधार स्वत:मागे बघतात.
जगातल्या सगळ्या प्रकारचे कामगार, सैनिक, कम्युनिस्ट ते कॅपिटालिस्ट सगळ्या राजकीय पक्षातील तळागाळातले कार्यकर्ते, प्रत्येक धर्माचे अनुयायी हे यात मोडतात.
भीती कमी झाली, योजनाबद्ध आयुष्याची सवय होऊन कंटाळा आला की आता यांना सत्ता हवी असते.
हे मग भाई, दादा, बॉस, साहेब, मालक, सरकार वगैरे बनतात.


या तीन पातळ्या मनुष्याच्या उत्क्रांतीत खूप, खूप महत्वाच्या आहेत.
आपण सर्वजण यातून गेलो आहोत आणि स्वत:ला कितीही अध्यात्मिक म्हणवून घेतलं, तरीही बहुतेक जण यातच अडकलेलो आहोत.


या तीन पातळ्या आपली 'animal instincts' आहेत.
ही आपल्यावर अनेक प्रकारच्या नकारात्मक भावनांमधून अंकुश ठेउन नाचवतात.
प्रत्येक पातळीवर आपल्याला मनाच्या सुप्त खोलात का असेना, 'वर' जायचा ध्यास असतोच, पण या तिनात असताना आपल्याला आयुष्य हे खूप कठीण, निरर्थक वाटतं. कुठेही समाधान मिळत नाही आणि नक्की काय कमी आहे हे ही कळत नाही.

या तिनांचा विळखा सैल झाला की आपण सतत बाहेर बोट दाखवायचं कमी करून पहिल्यांदा हा प्रश्न स्वत:लाच विचारतो की -
'मी कोण आहे?'
या चौथ्या पातळीपासून आपला आध्यात्मिक प्रवास सुरु होतो.


सर्वसाधारणपणे कुणालाही न दुखावणारे (शाब्दिक हिंसाही वर्ज्य आहे बरं का!), स्वत:च्या शोधाची जाणीव झालेले असे हे लोक आता हे ही जाणतात की मेल्यावर 'त्या तिथे पलीकडे तिकडे' ही एक भव्य असं विश्व आहे जे आपलं खरं घर असेल असं त्यांना वाटतं.
यांना मरायची घाई नसते. अजून भावनांचा उद्रेक होतो, पण ते काबू राखावा या जाणिवेपर्यंत पोचलेले असतात.

पाचव्या पातळीचे लोक बर्याच अंशी निर्लिप्त राहू शकतात.
त्यांच्यावरही संकटं येतात, पण ते दुसर्याला न दुखावता शांत राहू शकतात.
या शांतपणामागे 'मरा तुम्ही, काही सांगून उपयोग नाही' हे भाव नसतात!
ते दुसर्यांच्यात नाक खुपसत नाहीत आणि स्वत:च्या मार्गावरून विचलित होत नाहीत.

सहाव्या पातळीवर पोचेपर्यंत पुनर्जन्मांची आवश्यकता संपलेली असते.
या व्यक्ती पृथ्वीवर येतात ते लोकहितासाठी.
जगातले सगळे साधू -संत, अध्यात्मिक प्रवृत्तीची माणसं ज्यांच्यामुळे मोठ्या जनसमुदायाला लाभ झाला आहे असे यात येतात.
हे उद्योगपती, कार्यकर्ते असू शकतात. गांधी, मंडेला, मदर तेरेसा, विवेकानंद, अनेक क्षेत्रातील मोजक्या व्यक्ती यात येतील.

सातव्या पातळीवर अशी चैतन्य आहेत जी जेव्हा पृथ्वीवर येतात, तेव्हा अक्ख्या पृथ्वीचे तरंग बदलून अधिक शक्तिशाली, अधिक शांत, सकारात्मक बनवतात.
यात बुद्ध, कृष्ण, येशू, पैगंबर या सारखे युग पुरुष येतात.

आता आपल्याला हे पक्कं जाणून घ्यायचंय.
आपल्याला पाचव्या पातळीपर्यंत जायचंच आहे आणि ते ही स्वबळावर.


पहिल्या तीन पातळ्यांचे गुण आहेत भीती, वासना आणि भावना.
अनेकांच्या मनात सतत काही न काही धास्ती असते. ती काढायचा ते प्रयत्नही करत नाहीत. त्यांच्या जवळचे ही 'तो/ती/ते/त्या आहेतच तशा' म्हणून लक्ष देत नाहीत.
कुठल्याही देवाची, स्वामींची नुसती उपासना करून काहीच फायदा होत नाही.
'नशिबात आहे म्हणून भोगायलाच पाहिजे' ही केवळ आळशीपणाला प्रचंड उत्तेजन देणारी वृत्ती फक्त आपल्यातच आहे.
भूक लागली की आपण 'असेल नशिबात तर पडेल माझ्या तोंडात' म्हणत नाही.
हरीवर कितीही भक्ती असली तरी खाटल्यावर बसून राहत नाही.
नोकरी, चोरी - काही न काही करतोच! अगदी काम ही!

माझ्या पास्ट लाईफ रिग्रेशनच्या सेशन मधून एक गोष्ट सतत पुढे येते.
आपल्या भीती, वासना व भावनांकडे दुर्लक्ष करून पुष्कळांना अध्यात्मिक प्रगतीची घाई झालेली असते.
'अध्यात्मिक प्रगतीसाठी मी काय करू?' हा प्रश्न खराच मनापासून विचारलेला असतो.

त्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नही चालू असतात पण दुसरीकडे कुणावर प्रचंड राग असतो.

नाती बिघडलेली असतात आणि त्यांचा विचारच करायचा नसतो.
या गोष्टी मागे ढकलून तुम्ही प्रगती करू शकत नाही हे प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा.
हे गुंते न सोडवल्यामुळे परत - परत त्याच व्यक्तीनबरोबर जन्म घ्यावे लागणार आहेत हे ध्यानी असू देत!
त्या पेक्षा आपल्या खालच्या तीन पातळ्यांचा शांत चित्ताने विचार करा.
स्वत:शी इमानदारीने कुठे चुकत आहात ते मान्य करा, हो'पोनोपोनो करा, विपश्यनेला जा.

पोटातलं कडू गाठोडं कमी होत विरघळून गेल्याच तुम्हालाच आतून कळेल.
तीच तुमच्या अध्यात्मिक प्रगतीची सुरुवात आहे.

पुढच्या पोस्टमध्ये या साती पातळ्यांवर ध्यान कसं करायचं ते सांगेन.

आपण सगळे न, एक ' work in progress ' आहोत! याचा पुरावा हाच की आपण पृथ्वीवर आहोत!
म्हणून सेशन ला आलात तर मोकळेपणाने मागील जन्म बघा। तुम्ही मागील जन्मापासून आजपर्यंत किती प्रगती केली आहे हे अनुभवाल, आजच्या प्रश्नांचं भय वाटणार नाही आणि नाती, भावना व वासना या गोष्टी भेडसावणार नाहीत.


बाकी ठीक!
मजेत रहा!

No comments:

Post a Comment