Sunday, July 17, 2011

सिनेमा रसग्रहण

नमस्कार, मंडळी!

मी १५ जून म्हंटलं होतं पण माझी भिंगरी चालूच होती!

आधी त्या एक महिन्याच्या कोर्स बद्दल सांगते!

पुण्याच्या Film Institute व Film Archives या दोन संस्था मिळून दर वर्षी एक महिन्याचा 'सिनेमा रसग्रहण' नावाचा कोर्स चालवतात.

सरकारी काम असल्यामुळे म्हणा, याची फारशी वाच्यता होत नाही, तरी ६० सीटस साठी ११०० फॉर्म्स आले होते!

देशाच्या कुठल्या-कुठल्या कोपारयातून लोक आले होते!

शिवाय बांगलादेशातून एक व श्रीलंकेतून ३ होते!
सर्व-साधारणपणे आपण सिनेमा बघतो म्हणजे नट-नट्या कोण आहेत, गाणी कुठली आहेत आणि कुठे शूटिंग झालाय एवढा विचार करतो आणि नंतर 'बरं होतं' किंवा 'काय वाट्टेल ते दाखवतात' असं म्हणतो.

पण एखाद्या दिग्दर्शकाला काय दाखवायचं होतं, ते तो १००% दाखवू शकलाय का, त्यासाठी त्याने कुठली तंत्र वापरली, एखाद्या सीनमध्ये काय काय होतं, पिक्चर केव्हा व का 'कंटाळवाणा' होतो हे सगळं या कोर्समुळे समजायला लागतं!

तुम्हाला माहित आहे आपला सिनेमा कसा सुरु झाला?

त्याची खरी सुरुवात आदि मानवाने शेकडो वर्षांपूर्वी गुहेचा भिंतींवर आपल्या आयुष्यातल्या घडामोडींची रेखाचित्र काढून केली!

काही शतकांनंतर रंग गवसले आणि कापड, कागद, कॅन्वस, भिंती, छत, दिसेल त्यावर निसर्गातल्या व मनातल्याही घडामोडी रंगू लागल्या.

गेल्या दीड-दोनशे वर्षांपासून शास्त्रात वेगाने प्रगती होत चालली होती.

रसायन शास्त्रात जशा नव्या गोष्टी आल्या, त्यांचा वापर वेग-वेगळ्या पद्धतीने केला जाऊ लागला.

आधी साधा कॅमेरा आला.
काळी-पांढरी चित्रं आली.

मग गती बंदिस्त करण्याची कला आली.

त्या कॅमेर्याचं महत्व पहिल्या महायुद्द्धात जर्मनीने जाणलं व आपली मतं व विचार यांचा सतत मारा करून लोकांचं मन आपल्याला हवं तसं घडवायला फोटो व सिनेमाचा अत्यंत खुबीने वापर केला.

दुसर्या महायुद्धाच्या वेळेपर्यंत अमेरिका, इंग्लंड व फ्रांस हे देशही हे तंत्रज्ञान वापरू लागले होते.

युद्ध संपल्यावर सिनेमातले विषय जरा आपापल्या देशातल्या परिस्थितिंकडे वळले.

शंभर वर्षापूर्वीही अमेरिका हे सगळ्या प्रकारच्या संशोधनांसाठी, पेटंट घेण्यासाठी व ते घेतल्यावर लगेच जगभर त्या गोष्टीची विक्री करून परत संशोधनात पैसे ओतण्यासाठी प्रसिद्ध होतं!

हॉलीवूडने जोम धरला होता,
अनेक उत्तम सिनेमे बाहेर येत होते.

कॅमेरे, चित्रीकरण,ध्वनी, दिग्दर्शन, विषय - सगळं खूप खूप उत्साहित करणारं होतं.

त्या काळात अमेरिकेतच नव्हे तर इंग्लंड, पोलंड, फ्रांस, जर्मनी, आणि जपान या देशात जे सिनेमे झाले, ते आजही अचंबित करायला लावतात!

त्यांचे विषय, हाताळण्याच्या वेग-वेगळ्या पद्धती ज्या त्या-त्या देशाच्या अनुभवातून आल्या होत्या, मन गुंगवून टाकतात!

कोर्स मध्ये आम्हाला दुपारी ४ पर्यंत लेक्चर्स असायची.त्यात ही क्लिप्स दाखवायचे.

४.४५ ला एक सिनेमा असायचा. त्यातील महत्वाच्या गोष्टी आधी सांगायचे.

७.३० ला दुसरा सिनेमा. त्यावरची चर्चा दुसर्या दिवशी सकाळी व्हायची.

असे आम्ही जगातील अनेक 'क्लासिक' असे सिनेमे बघितले!


मी काही नावं देते, tv वर, नेटवर पहा किंवा एखादा फिल्म-क्लब बनवा आणि बघा!

१. मेट्रोपोलीस - जर्मनी - १२७ मिनिटं - Lang .

२.Battleship Potemkin - रशिया -७२ मिनिटं - आय्झेन्स्तीन

३.सिटीझन केन - यू.एस -११९ मिनिटं -ओर्सन वेल्स.

४.सनराइज - १९२७ - यू.एस. - मुरनाव

५.रोम ओपन सिटी - १९४५ -इटली - १०१ मिनिटं - रीझेलिनी.

६.A Man Escaped - १९५६ - फ्रांस - जर्मनी - ९० मिनिटं - ब्रेसोन

७. दोदेस्का डेन - जपान - कुरोसावा

८. Man विथ अ मूवी कॅमेरा - १९२९ - रशिया - ६० मिनिटं - वर्तोव

आपल्याकडचेही काही सिनेमे दाखवले, जसे 'कुम्माती', 'साहिब, बीबी और गुलाम', 'चारुलता', 'पाथेर पांचाली', 'सुबर्ण रेखा', 'संत तुकाराम', 'मी सिंधुताई सपकाळ', 'कनसेंब कुदुरेयमेले' वगैरे.

या शिवाय आपले सिनेमे/documentary घेउन काहीजण आले होते व त्यांनी नंतर आमच्या प्रश्नांना उत्तरंही दिली.
सिनेमात 'short फिल्म' हा एक खिळवून टाकणारा प्रकार असतो हे नवीन कळलं!

यात '१० मिनिट्स ओल्डर' सारख्या जागतिक फेस्टिवल मधले काही दाखवले.

जे हवं ते सांगा, पण १० च मिनिटात !

लोक काय अफलातून विषय घेतात आणि काय त्या मांडण्याच्या क्लुप्त्या!

एकूण काय, सिनेमा ही जेव्हढी 'एन्जॉय' करायची गोष्ट आहे तेवढीच गांभीर्याने घ्यायचीही आहे हे कळलं!

प्रत्येक लहान-मोठ्या शहरात फिल्म-क्लब असावे असं या संस्थांना मनापासून वाटतं व त्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला ते तयार आहेत.

तर आता तुम्ही ही मनावर घ्या व मी दिलेल्या यादीतले तर सगळे बघाच!

बाकी एन्जॉय!

No comments:

Post a Comment